आमलकी

आमलकी

लॅटिन नाव – Emblica officinalis

पर्याय– धात्री, अमृता, शिवा, दिव्या इ.

आमलकी म्हणजे आवळा हे वात, पित्त, कफ या तिन्ही दोषांचे शमन करणारे व शरीरावर रसायन म्हणून काम करणारे औषधी फळ आहे.

आवळा अन्नाचे पाचन करतो ,अग्नी दिपन करतो म्हणजे भूक वाढवतो, क्लेदाचे पचन करतो, वाताचे व मलाचे अनुलोमन करतो. धातूंचे शोधन करून मल बाहेर काढण्याचे काम करतो.

हन्ति वातं तदम्लत्वात्पित्तं माधुर्यशैत्यतः |

कफं रुक्षकषायत्वात्फलं धात्री त्रिदोषजीत् || भा. प्र.

वयस्थापन, रसायन – आमलकी वयस्थापक आहे म्हणजे ती तारुण्य टिकवण्याचे काम करते , तसेच सगळ्या धातूंचे योग्य प्रकारे पोषण करत असल्याने रसायन म्हणून काम करते. आवळ्याच्या तेलाने अभ्यंग केले असता त्वचेवर सुरकुत्या पडण्याचे प्रमाण कमी होते.

वृष्य – आमलकी शुक्रवर्धक असल्याने वृष्य म्हणून काम करते आमलकी चूर्णाला आमलकी स्वरासाची भावना देऊन मध, तूप, साखर यांच्यासोबत सेवन केले असता वृष्य कार्य होते.

प्रजास्थापन – गर्भाशयाचे दौर्बल्य दूर करत असल्याने गर्भास्थापनेत मदत करते.

वर्ण्य – आमलकी रक्तगत पित्ताची तिक्ष्णता व उष्णता कमी करण्याचे काम करते. शरीराचा वर्ण उजळवते.आवळा चूर्णाचा उटण्यासारखा उपयोग केल्याने त्वचेवरील काळसरपणा डाग कमी होऊन टविटवितपणा येतो तसेच नियमित वापराने त्वचा तरुण दिसते.

केश्य – तूप साखरेसोबत आवळा चूर्ण घेतल्याने केसगळती कमी  होते. आवळा तेल केसांना लावल्याने केस पांढरे होने कमी होते.

जीर्णज्वर– खूप दिवसापासून अंगात बारीक ताप असल्यास आवळयाचा उपयोग होतो. आवळा आधी धातुंचे शोधन  करून नंतर त्याचे बृहन करण्याचे काम करते.धात्रीसिध्द तुपामुळे जीर्णज्वर दूर होतो तसेच आवळ्याचा काढा साखर आणि  मधासोबत घेतल्यानेही फायदा होतो.

मधुमेह– मधुमेहामध्ये शरिरातिल क्लेद वाढलेला असतो तो कमी करण्याचे काम आवळा करतो. मधुमेहामध्ये आवळा रस हळद आणि मधासोबत सेवन केल्याने फायदा होतो.

मूत्रदाह – आवळा हे शीत गुणाचे असल्याने व शरीरातील उष्णता कमी करणारे असल्याने मूत्रदाह होत असेल तर आवळा रस साखरे सोबत घेतल्याने फायदा होतो.

श्वेतप्रदर – स्त्रियांना पांढरे पाणी जाण्याचा त्रास असेल तर हळदीसोबत आवळ्याचा काढा घेतल्याने फायदा होतो. योनीदाह असल्यास आवळारस  साखरेसोबत घेतल्यास दाह कमी होतो.

अम्लपित्त – अम्लपित्ताच्या व्यक्तीला मळमळ उलटी, चक्कर अशी लक्षणें असतील तर आवळ्याचा रस साखरेसोबत घ्यावा.

दौर्बल्य – सतत थकवा जाणवत असेल तर आवळा चूर्ण साखर व तूपा सोबत सकाळी उपाशीपोटी घ्यावे यामुळे सगळ्या धातूंचे योग्य पोषण होते व थकवा दूर होतो.

         या लेखाचा उद्देश आयुर्वेदिक औषधांची उपयुक्त माहिती देणे हा आहे.   

   आमलकी हे औषध म्हणून घेण्यापूर्वी तज्ञ डॉक्टरांकडून    सल्ला घेणे चांगले. कारण प्रत्येक औषधाचे प्रमाण आणि उपयोग हा प्रत्येक व्यक्तीची प्रकृती लक्षणे यानुसार वेगवेगळा होते.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *