शुंठी
पर्याय– महौषध, विश्वभेषज, नागर इ.
लॅटीन नाव– zingiber officinale
शुंठी रुच्यम् आमवातघ्नी पाचनी कटूका लघुः |
स्निग्धोष्णा मधुरा पाके कफवात विबंधनुत ||
वृष्या स्वर्या वमिश्वासशूलकासहृदय आमयान |
हंती श्लिपद शोथार्श अनाहोदरमारूतान् || भा.प्र.
शुंठी ही तिखट रसाची, उष्ण विर्याची असते. कफ आणि वाताचे शमन करते तसेच शरीरातील साम दोषांचे पचन करण्याचे कार्य करते.खरे तर साम दोषांमुळेच ज्वर, हृद्रोग, आमवात,श्वास, कास, अश्या रोगांची उत्पत्ती होते म्हणून या सगळ्या रोगांमध्ये शुंठीचा चांगला उपयोग होतो. तसेच शरीरातील क्लेद आणी मेद कमी करण्याचे कार्यही शुंठी करते.
तसेच सुंठीची आणखी कोणकोणते विशेष कार्य असतात ते आपण पुढे बघू.
रुच्या- म्हणजे रुची उत्पन्न करण्याचे काम शुंठी करते. जिभेवर कफाचा लेप झाल्याने जी अरुची उत्पन्न होते त्यामध्ये कफाचा नाश करून रूची उत्पन्न करण्याचे काम सुंठी करते. अशावेळी सैंधव मिश्रित सुंठी चूर्णाचे मधासोबत चाटण घेतल्याने जिव्हेचे शोधन होऊन अरोचक दूर होते.
अग्निदिपन व पोटाचे विकार– सुंठी आपली पाचकाग्नी वाढवून भूक वाढवण्याचे काम करते. अतिसार, ज्वर, आमवात यामध्ये आमपाचन करण्यासाठी सुंठीचा चांगला उपयोग होते. अन्नाचे योग्य रीतीने पचन न झाल्याने आमरसाची उत्पत्ती होऊन जड पणा वाटतो जेवणाची इच्छा होत नाही अशावेळी आमरस पचनासाठी सुंठीचे सेवन योग्य ठरते शुंठी कोष्ठांमधील वाताचे शमन करण्याचे कार्य करते त्यामुळे आध्मान आणि शूल तत्काळ शमन पावते. पोटात वाताचा गोळा येऊन वेदना होत असल्यास सुंठी सिद्ध घृताचा उपयोग होतो.
संधिविकार– सुंठी आणि गुडूची काढा संधी मधील आमवाताचा नाश करण्यास उपयुक्त आहे सुंठी आणि गोक्षुर काढा आमवातामधील वेदना नष्ट करण्यास उपयुक्त आहे.
अग्निमांद्यामुळे श्वास कास हे रोग उत्पन्न होतात व सुंठी अग्नीचे दीपन करणारी असल्यामुळे या सर्व रोगांमध्ये सुंठीचा उपयोग होते.
श्वास- श्वासामध्ये गुळ व सुंठी सम मात्रेत सेवन केल्याने श्वासाचे शमन होते.
कास– वातच कासामध्ये साखर व सुंठी चूर्ण घ्यावे किंवा जुना गुळ, तेल व सुंठीचे चाटण घ्यावे कफ असल्यास खोकल्यामध्ये सुंठी चूर्ण सहदासोबत चाटावे.
स्तन्यशोधन– मातेच्या दुधाचे योग्य पचन करून शुद्ध स्तन्य निर्माण करण्याचे कार्य सुंठी करते त्यामुळे बाळांना दूध पचण्यास हलके होते म्हणून बाळांना मातेचे दूध पचत नसल्यास मातेने गरम पाण्यासोबत सुंठी सेवन केल्यास उपयोग होतो.
या लेखाचा उद्देश आयुर्वेदिक औषधांची उपयुक्त माहिती देणे हा आहे.
शुंठी हे औषध म्हणून घेण्यापूर्वी तज्ञ डॉक्टरांकडून सल्ला घेणे चांगले आहे कारण प्रत्येक औषधाचे प्रमाण आणि उपयोग हा प्रत्येक व्यक्तीची प्रकृती, लक्षणे यानुसार वेगवेगळा होते.